नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना

– केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग व जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे युवकांना आवाहन

*स्टार्ट अप फेस्ट चे उद्घाटन

नागपूर – विदर्भातील युवकांच्या क्षमता, कर्तृत्व व विद्वत्ता वृद्धिगंत करणे हे त्यांच्याच हाती असून उपलब्ध संधीचा लाभ घेऊन त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे . त्यांनी नवकल्पनांना उद्योगात परावर्तित करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात केले . नागपूर महानगर पालिका व मेयर इनोवेशन काऊंसीलच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक मानकापूर क्रीडा संकूल येथे आयोजित ‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने ‘स्टार्ट अप फेस्ट’ व ‘द ॲसिलरेट’चे आयोजन करण्यात आले होते . ‘स्टार्ट अप फेस्ट’ च्या उद्घाटनाप्रसंगी गडकरी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते . या उद्‌घाटन सोहळ्याला महापौर श्रीमती नंदा जिचकार , उपमहापौर दीपराज पार्डीकर,आयुक्त आभिजीत बांगर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या इनोव्हेशन विभागाचे संचालक मोहित गंभीर,प्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशपुरे, संदीप कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण कल्पनांनी महानगरपालिकेद्वारे बायोसीएनजी प्रकल्प साकारले जात आहेत. मुनिसीपल वेस्ट पासून बायोडायजेस्टरद्वारे तयार झालेल्या बायो सीएनजीवर 350 बस, 150 ट्रक येत्या 3 महिन्यात संचालित करण्यात येतील. यामुळे मनपाचे दरवर्षी 60 कोटी वाचतील. गडचिरोलीतील वनवासी जनतेला जैवइंधनाच्या माध्यमातून रोजगार मिळेल. नुकतेच स्पाईसजेटच्या विमानाने जैवइंधन मिश्रीत एव्हिएशन फ्युएलच्या साहायाने दिल्ली ते देहरादून असे अंतर यशस्वीरित्या पुर्ण केले, अशी माहिती ग़डकरींनी यावेळी दिली.

स्टार्ट अप. मेक इन इंडिया. स्टँड अप इंडिया , मुद्रा या शासनाच्या योजना युवकांसाठी असून त्यामूळे युवकांच्या नवसंकल्पनांना पाठबळ मिळत आहे. युवकांनी सुचविलेल्या रेन हार्वेस्टिंगच्या नवकल्पना मनपा अंमलात आणत आहे. इनोवेशन पर्वच्या माध्यमातून युवकांच्या इच्छा व आकांक्षा यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल असून त्यांना नाविन्यपूर्ण प्रयोग साकारण्यास मदत झाली आहे असे मत श्रीमती नंदा जिचकार यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले .

विदर्भात टँलेटची वाणवा नाही त्यामुळे युवकांनी स्वतःमधील सुप्त गुणांना ओळखून त्यांना चालना द्यावी असे आवाह्न ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांनी केले. याच दिवशी सायंकाळी ‘सोशल मीडिया फॅन फेस्ट’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी स्टार्ट अपसंदर्भात माहिती देणारी दालनेही स्थापण्यात आली होती. कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अडचणींवर मात करा, ‘स्टार्ट-अप’ने झेप घ्या!

युट्यूबर रणवीर अलाबादीयाने दिला तरुणाईला मंत्र

नागपूर, ता. २४ : आपल्या मनातील संकल्पनांना मूर्त रुप आणण्याचे स्टार्ट-अप हे मोठे माध्यम आहे. मात्र अनेकदा याविषयी पुरेपुर माहिती नसल्याने अपयशाचा सामना करावा लागतो. कोणत्याही गोष्टीच्या यशासाठी कोणतिही अपेक्षा न ठेवता काम करणे व इतरांना देत राहणे ही भावना आवश्यक आहे. कामातील सातत्य आणि त्यामागची मेहनत ही कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक आहे. मात्र या सर्वांमध्ये अनेक अडचणी येतात या अडचणींचा धैर्याने सामना करा, अडचणींवर मात करा आणि आपल्या संकल्पनांना ‘स्टार्ट-अप’ची जोड देउन झेप घ्या, असा मंत्र सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी मानकापूर स्टेडियममधील उपस्थित तरुणाईला दिला.

‘इनोव्हेशन पर्व’च्या दुस-या दिवशी ‘स्टार्ट-अप’ फेस्टमध्ये सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी शनिवारी (ता.२४) मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये उपस्थित तरुणाईशी संवाद साधला. यावेळी तरुणांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देत त्यांना ‘स्टार्ट-अप’चा नवा मंत्रही त्यांनी दिला.

अभियांत्रिकी शिक्षण घेउनही कोणत्याही कंपनीमध्ये प्लेसमेंटमध्ये सहभागी झालो नाही. यामागे स्वत:च स्वत:चा बॉस बनायचे ही भावना होती. त्यातून पुढे अनेक अडचणींवर मात करून युट्यूब चॅनेलचा उदय झाला आणि तो जगाने डोक्यावर घेतला. केवळ एक संकल्पना आणि त्यावरील सातत्याने करण्यात येणारी मेहनत ही कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी आवश्यक आहे, ही शिकवण आयुष्यात पदोपदी मिळत आहे, असेही सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी सांगितले.

स्वत:चे ‘स्टार्ट-अप’ सुरू करण्यापूर्वी मार्केट गॅपची माहिती घ्या, मार्केटमध्ये काय हवे आहे याचा अभ्यास करा. एखाद्या अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनात काही वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करा, त्यातून मिळणारे अनुभव स्व निर्मितीला बळ देणारे ठरले, असाही मंत्र सुप्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादीया यांनी दिला.

ध्येय प्राप्तीसाठी झपाटून कार्य करा : सुप्रसिद्ध युट्यूबर गौरव तनेजा

स्वत:च्या मनातील संकल्पनांच्या पूर्ती करण्यासाठी त्या संकल्पनांच्या पुढील वाटचाल आणि मार्गक्रमणासाठी ‘इनोव्हेशन पर्व’सारखे व्यासपीठ महत्वाची भूमिका बजावते. आज आपल्या संकल्पनांना बळ देण्यासाठी असे व्यासपीठ महत्वाचे ठरते. मात्र हे व्यासपीठ फक्त आपल्याला एक मार्ग दाखवितात. आपल्या संकल्पनांच्या पूर्तीसाठी त्याला ‘स्टार्ट-अप’ची जोड देउन कार्य करण्यासाठी स्वत: जमिनीस्तरावर कार्य करणे आवश्यक आहे. एकदा आपले ध्येय निश्चीत करुन त्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने झपाटून कार्य करा, असा मंत्र सुप्रसिद्ध युट्यूबर गौरव तनेजा यांनी दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले, आयुष्यात काही करण्याच्या भावनेने आज युट्यूबर म्हणून आज ओळख मिळाली आहे. जिममध्ये तास न् तास घालविताना अनेकांनी वेड्यात काढले. मात्र त्यातून मिळणा-या यशामध्ये तेच व्यक्ती पुढे आले. जीवनात काही मिळवायचे असेल तर स्वत:च्या ध्येयासाठी वेड्यासारखे झपाटून कार्य करा, ही शिकवण त्यावेळपासून मिळाली आणि तोच मंत्र सर्वांसाठी प्रेरणा ठरावा, अशी अपेक्षाही सुप्रसिद्ध युट्यूबर गौरव तनेजा यांनी व्यक्त केली.

‘स्टार्ट-अप’च्या यश-अपयशावर चर्चासत्र

यावेळी ‘स्टार्ट-अप’द्वारे आपल्या संकल्पनांना मूर्तरुप देउन त्यांची अंमलबजावणी करणा-यांनी आपल्या उद्योगांबाबत माहिती दिली. रिसायकल बेल प्रा.लि.चे मधुर राठी, बिन बॅगचे सीईओ श्री. अचित्र, ग्रोनअप्सचे यश मेश्राम, सरल डिझाईनचे अभिजीत पाटील, किसान समृद्धी 2.0 चे अजय अंबागडे व आर्या अंबागडे या वडील व मुलीची जोडी, आयआयटी बॉम्बेचे अथर्व पाटणकर, अपना घरचे प्रकाश जायस्वाल आदींनी ‘स्टार्ट-अप फेस्ट’द्वारे आपल्या संकल्पना मांडल्या.

याशिवाय गटचर्चेमध्ये ‘स्टार्ट-अप’ अपयशी का होते? याविषयावर आयोजित गटचर्चेमध्ये संतोष अब्राहम, भारत सरकार एमएचआरडी चे इनोव्हेशन डायरेक्टर डॉ. मोहत गंभीर, प्रियश जिचकार, मुकुंद प्रसाद यांनी विषयाशी संबंधित आपली भूमिका मांडली. गटचर्चेचे समन्वयन ज्येष्ठ मार्गदर्शक चैत जैन यांनी केले.