31 डिसेंबर पर्यंत सर्व बसेस धुरविरहित करा – महापौर संदीप जोशी

परिवहन समितीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्देश

नागपूर,ता.2. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत सेवेत असणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणावर धुर फेकत असल्याची तक्रार येत आहे. यामुळे प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. नागरिकांना त्रास होत असल्याने ते वारंवार तक्रार करत आहे. 31 डिसेंबर पर्यंत या सर्व बसेस धुरविरहित झाल्याचे दृश्यस्वरूपात मला दिसले पाहिजे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

या बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, उपायुक्त राजेश मोहिते, परिवहन श्रम अधिकारी अरूण पिपरूडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, वाहतूक व्यवस्थापक बी.आर.सोनटक्के, प्रशासकीय यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, हंसा सिटी बसेसचे आदित छाजेड, ट्राव्हल्स टाईम्सचे सुमीत वैद्य, आर.के.सिटीबसचे प्रतिक राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपाद्वारे चालविण्यात येणाऱ्या आपली बस सेवेच्या बसेसबद्दल वारंवार तक्रारी येत असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. बसेस खूप मोठ्या प्रमाणावर धुर फेकत असल्याचे दिसून येत आहे, याला जबाबदार कोण ? असा सवाल त्यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला. काहिही करा, मला रिझल्ट हवा, असे म्हणत 31 डिसेंबर पूर्वी मनपाच्या शहरात धावणाऱ्या सर्व बसेस धुरविरहित झाल्या पाहिजे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

शहरात किती बस स्थानके आहे, याचा आढावा महापौर संदीप जोशी यांनी घेतला. स्थानके उपलब्ध असून देखील बसेस स्थानकावर न थांबता रस्त्याच्या मधोमध किंवा स्थानकापासून दूर का थांबतात. चालक प्रशिक्षित नाही का ? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. बसस्थानकावर 10 मीटर पुढे मागे रंगरंगोटी करा. पार्किंग असेल तर ते तात्काळ बंद करा. त्याठिकाणी सूचना फलक लावावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. संबंधित अधिकाऱ्यांनी यावर जबाबदारीने लक्ष द्यावे, 31 डिसेंबर नंतर ही स्थिती अशीच दिसली तर अधिकाऱ्यावर व यंत्रणेवर कारवाई करण्यासाठी कसलाही विचार करणार नाही, असा ईशाराही महापौरांनी यावेळी बैठकीत दिला.

ओबीसी व भटक्या विमुक्तांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा डाव

*ओबीसी व भटक्या विमुक्तांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा डाव

 

 

➡शिष्यवृत्ती अभ्यासक खिमेश बढिये यांचा आरोप
➡जातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा तुघलकी आदेश

नागपूर – राज्यातील ओबीसी व भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी ऐनवेळी जातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश समाज कल्याणने दिला आहे. अशाप्रकारे विद्यार्थ्यांची अडवणूक करुन समाज कल्याण विभाग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्यास हातभार लावत असल्याचा आरोप शिष्यवृत्ती अभ्यासक खिमेश बढिये यांनी केला आहे.
राज्य शासनाने 27 मे 2019 च्या अध्यादेशान्वये ओबीसी व भटक्या विमुक्त जातीच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना डॉ आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली. या योजनेत प्रती वर्ष 1000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मात्र सुरुवातीपासूनच या क्रांतीकारी निर्णयाला हरताळ फासण्याचा प्रयत्न समाज कल्याणने केला.27 मे 2019 रोजी शासननिर्णय जारी झाल्यावर सुद्धा सप्टेंबर महिन्यापर्यंत समाज कल्याण विभागाला या योजनेचे सोयरसुतक नव्हते. अखेर ही शिष्यवृत्ती प्रभावी पध्दतीने लागू झाली पाहिजे यासाठी बेलदार समाज संघर्ष समिती, संघर्ष वाहिनी व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघातर्फे विभागीय उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड यांना निवेदन दिले होते. मुजोर समाज कल्याण प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी 19 सप्टेंबर 19 रोजी घंटानाद आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल घेत समाज कल्याण विभाग कामाला लागले. उशिरा का होईना पाचही जिल्ह्य़ात पंचायत समिती स्तरावर शाळा – शाळांचे शिबीर लावण्यासाठी समाज कल्याणने पुढाकार घेतला. मात्र उशिरा आलेले शहाणपण विद्यार्थ्यांच्या जिवावर उठले आहे. एकतर विद्यार्थ्यांना उशिरा सूचना देण्यात आल्या व त्यातही ऐनवेळेवर विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. यामुळे 60 वर्षानंतर लागू झालेल्या शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात समाज कल्याण विभागीय उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता तसेच त्यांनी घंटानाद आंदोलनाच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरीही जिल्हा समाजकल्याण अधिकारी जातीचे प्रमाणपत्र सक्तीचे करुन झारीचे शुक्राचार्य ठरत आहे. समाज कल्याण विभाग ओबीसी व भटक्या विमुक्तांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा डाव रचत असल्याचा आरोप शिष्यवृत्ती अभ्यासक खिमेश बढिये यांनी केला आहे. जातीच्या प्रमाणपत्राची अट तात्काळ रद्द करून 31 डिसेंबर पर्यंत फाॅर्म स्विकारण्याची मुदतवाढ द्यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. समाज कल्याण विभागाच्या या भोंगळ कारभाराची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील, विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे.

उद्यापासून करा जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनवरून प्रवास

  • प्रवाश्यांची प्रतीक्षा संपली, उद्यापासून सुरु होणार जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन

*नागपूर, १८:* बहू प्रतिक्षीत असणारे नागपूर मेट्रोचे जयप्रकाश नगर स्टेशन आता प्रवाश्यांच्या सेवेत उद्या दि. २० नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येत आहे. हे स्थानक सुरु व्हावे म्हणून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. मार्गिकेच्या मध्यावर असणाऱ्या जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन निकटचा संपूर्ण परिसर गजबजलेला असून आसपास रहिवासी क्षेत्र, खाजगी हॉटेल्स, व्यवसाय, मार्केट प्लेस, धार्मिक स्थळ इत्यादीने व्यापलेला आहे त्याशिवाय मिहान येथे कार्यरत असलेले कर्मचारी या परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवास करत असल्यामुळे सदर मेट्रो स्टेशन सुरू होण्याची नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती, त्यांची हि प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून उद्या पासूनच हे स्थानक सुरु करण्यात येणार आहे. प्रवाश्यांना उद्यापासून माझी मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले असून प्रवाश्यांच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. लिफ्ट, एस्केलेटर, दिव्यांगांसाठी प्लॅटफॉर्म व स्टेशन परिसरात अनेक विशेष सोय करण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय आहे की, नुकतेच रेल्वे बोर्डाने वर्धा मार्गावर (खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज) ताशी ८० किमी’ची मंजुरी महा मेट्रोला दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या मार्गावर ताशी ८० किमी वेगाने मेट्रोचा प्रवास नागरिकांना करता येणार आहे.

सध्या दर ३० मिनिटांनी मेट्रोची प्रवासी सेवा नागरीकांकरिता सुरु असून ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार असल्याने प्रवाश्यांना फायदा होणार आहे.

अविनाश आचार्य यांना पीएचडी 

नागपूर, दि. 18 नोव्हेंबर 2019:-

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने व्यवसाय प्रशासन आणि व्यवसाय व्यवस्थापन या शाखेअंतर्गत सादर केलेल्या शोधप्रबंधाकरिता अविनाश जनार्दन आचार्य यांना पीएचडी पदवी बहाल केली आहे.

‘2000 ते 2010 या कालावधीत महावितरणमधील प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी व आयोजन यांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि संस्थेच्या विकासावर त्याची प्रभावीता(Analytical study of desiging and conduction training programmes in MSEDCL from 2000 to 2010, and its effectiveness on the development of the organization)या विषयावरील त्यांच्या या शोधप्रबंधासाठी ही पदवी बहाल करण्यात आली असून डॉ. बी. के. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी हा शोधप्रबंध पुर्ण केला आहे. अविनाश आचार्य हे महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयात वरिष्ठ व्यवस्थापक (मान संसाधन – विधी) या पदावर कार्यरत असून त्यांच्या या यशाबद्दल महावितरणमध्ये त्यांचयावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची तपशीलवार माहिती घ्या

निवडणूक निरीक्षकांनी दिल्या टिप्स

नागपूर दि.28:विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चाबाबतचे तपशील काटेकोरपणे तपासण्याच्या सूचना खर्चविषयक निवडणूक निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी दिल्या.

उमेदवारांच्या प्रचार प्रसिद्धी, जाहीर सभा आदींच्या खर्चाबाबतचा दैनंदिन अहवाल उमेदवारांकडून मिळविण्यासंदर्भातील टिप्स निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात निवडणूक निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती आणि गौतम पात्रा यांनी नोडल अधिकाऱ्यांचा कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुजाता गंधे, शितल देशमुख, हेमा बढे, शिवनंदा लंगडापुरे, आणि जिल्हा नियोजनचे विजय कोल्हे यांची उपस्थिती होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी. सर्व निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांनी निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत जबाबदारीने काम करावे. सर्वांनी एक टीम म्हणून उत्स्फुर्तपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात मात्र दक्ष राहून काम करावे. विशेष प्रशिक्षणानंतरही काही अडचणी येत असतील तर वरिष्ठांकडून तात्काळ शंकानिरसन करुन घेण्याचे निवडणूक निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी सांगितले.

निवडणूक काळात कर्तव्यावर असलेल्या नोडल अधिकारी, भरारी पथक, स्टॅटेस्टीक, सर्व्हीलन्स टीम, व्हीडीओग्राफी टीमने अचूक नोंदी घ्याव्यात. त्या नोंदीबाबत तात्काळ निवडणूक खर्च निरीक्षकांना अवगत करावे. निवडणूक आयोगाने दिलेली जबाबदारी चोख पार पाडावी. आचारसंहिता काळात अवैध मद्यसाठा आणि रोकडीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही निवडणूक खर्च निरीक्षक द्वयांनी दिले.

केंद्रीय निवडणूक आयोगाला खर्च निरीक्षकांना वेळोवेळी अपडेट द्यावे लागतात. त्यामुळे ते अपडेट वेळोवेळी वरिष्ठांना कळवावेत, जेणेकरुन केंद्रीय निवडणूक आयोग जिल्ह्यातील अद्ययावत माहिती देऊ शकेल. राजकीय पक्षाचे मेळावे, रॅली तसेच निवडणूक विभागाच्या आढावा बैठकांचे चित्रीकरण असणे आवश्यक असल्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.

स्थानिक परिस्थिती, निवडणुकीदरम्यान होत असलेल्या विविध हालचाली यांवर लक्ष ठेवून त्या हालचाली वरिष्ठाना कळवावीत. सर्व विभाग आणि नागरिकांशी सदैव संपर्कात राहावे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा निवडणूक आयोगाला वेळोवेळी अहवाल पाठविला जातो. या काळात कर्तव्यात कसूर करणारांवर कडक कारवाई केली जाते. त्यामुळे आयोगाने नियुक्त केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेश व सूचनांचे दक्षतेने पालन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

सुब्रा ज्योती चक्रवर्ती हे नागपूर पूर्व, मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक असून, गौतम पात्रा हे उमरेड, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक आहेत.

मेट्रो पिलरवरील कलाकृती ठरतंय आकर्षणाचे केंद्र

नागपूर १६: वर्धा महा मार्गावरील छत्रपती चौकात मेट्रोच्या पिलरवर उभारण्यात आलेली कलाकृती या चौकातून चहुबाजूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आकर्षित करीत आहे. अल्प कालावधीत मेट्रोने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आलेख या कलाकृतीच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे. उभ्या भिंतीवर किंवा पिलरवर अश्या प्रकारची कलाकृती उभारण्याचा प्रयोग पहिल्यांदाच शहरात राबविण्यात आला असून याला नागरिकांतर्फे ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मेट्रोच्या पिलरवरील या कलाकृतीकडे पाहतांना यात एकूण १८ मनुष्य दोरीच्या साहाय्याने वरती चढतांना दिसत आहेत. हे चित्र दर्शविण्यासाठी मेट्रोच्या या पिलरवर लोखण्डी साहित्यांचा वापर करून दोरीसारखे दिसणारे जाळ तयार करण्यात आले. गेल्या अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नातून शहरातील ४० प्रसिद्ध कलाकारांनी ही कलाकृती तयार केली आहे. पिलरच्या ४९५ चौरस फूट इतकया भागावर ही कलाकृती चारही बाजूने दिसेल अश्याप्रकारे लावण्यात आली आहे. एम एस शीटच्या साहायाने संपूर्ण कलाकृती तयार करण्यात आली आहे. ट्राफिक सिग्नल सुरु होण्यापर्यंत चौकावर थांबलेले वाहनचालक कौतुहलाने या कलाकृतीकडे पाहतांना दिसत आहेत.

महा मेट्रोने ५० महिन्याच्या अल्प कालावधीत २५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग नागपूरकरांसाठी तयार केला. सरासरी २ किमीचा मार्ग दर महिन्याला तयार होत आहे. तसेच २०१९मार्च महिन्यात नागरिकांसाठी खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान प्रवासी सेवा देखील सुरु करण्यात आली. यामुळे नागरिकांना सीताबर्डी इंटरचेंज ते एयरपोर्ट किंवा मिहानपर्यंत मेट्रोचा आरामदायी प्रवास करून आवाजही करणे सहज शक्य झाले. यासाठी मेट्रोचे सर्व अधिकारी/कर्मचारी व हजारो मजूर दिवस रात्र कार्य करीत आहेत. एकजुटीने काम करून निर्माणाधीन प्रकल्पाचे कार्य पूर्ण होत आहे, हे या कलाकृतीच्या माध्यमातून दर्शविण्यात येत आहे.

लोकसंख्येचे नियंत्रणासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करा !

         जगात चीननंतर सर्वाधिक लोकसंख्या भारताची (136 कोटी) असून लोकसंख्या नियंत्रण ही भारताची सर्वांत मोठी समस्या बनली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील नैसर्गिक साधन सुविधा, आर्थिक स्थिती, रोजगार, अन्न-धान्य, शिक्षण, शासकीय सोयी-सुविधा, सुरक्षा व्यवस्था आदींवर प्रचंड ताण येत आहे. त्यात मुसलमानांना विवाह आणि मुलांना जन्म देण्याचे बंधन नसल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली मुसलमान आणि अन्य पंथीय यांना विशेष सुट देऊन देशात असमान कायदापद्धती व योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे बहुसंख्यांक हिंदूंमध्ये देशात आपल्याशी भेदभाव व अन्याय होत असल्याची भावना गेली 70 वर्षांपासून वाढतच आहे. ज्या प्रमाणे मोदी सरकारने घटनेचे कलम 370 हटवून एक देश-एक संविधान हे तत्त्व अंमलात आणले. तसेच समता, न्याय, बंधूता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एक देश-एक विधान लागू करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी केली. ते संविधान चौक, नागपूर या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते.

आंध्रप्रदेशात हिंदूंविरोधी कारवाया करणारे जगनमोहन रेड्डी यांचे सरकार विसर्जित करा !

          आंध्रप्रदेशचे ख्रिश्‍चन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारकडून हिंदुविरोधी कायदे बनवले जात आहेत आणि उघडपणे ख्रिस्ती धर्माचा प्रचार चालू करण्यात आला आहे. मंदिरांचे धन अन्य पंथियांना दिले जात आहे. मंदिरांच्या भूमी अवैधपणे विक्री केल्या जात आहेत, तसेच मंदिरांच्या परिसरांमध्ये अन्य पंथियांना व्यवसाय करण्याची अनुमती दिली जात आहे. तरी हिंदूंच्या मंदिरांची भूमी ताब्यात घेऊन त्यावर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा निर्णय तत्काळ रहित करावा, तसेच हैदराबाद उच्च न्यायालयाचा आदेश असतांना नियम धाब्यावर बसवून मंदिरांची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकार विसर्जित करण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

*या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या :

१. श्री जगन्नाथ मंदिर, पुरी येथील मठ, मंदिरे यांना बेकायदा ठरवून ती पाडण्याची चुकीची कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी. तसेच आतापर्यंत जे प्राचीन मठ तोडण्यात आले, ते ओडिशा सरकारने पुन्हा उभारून द्यावेत आणि याला दोषी असणार्‍यांवर कारवाई करावी.

२. नवी देहली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍या काँग्रेसच्या एन्एसयूआयचे अक्षय लाकडा यांच्यावर देशद्रोहाचा, तसेच राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच स्वा. सावरकर यांचा अपमान पुन्हा न होण्यासाठी विशेष कायदा करावा, तसेच स्वा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.

भाजप आणि काँग्रेसमधील वाद चांगलाच पेटला

भाजपचा झेंडा लावाल तर घरात घुसून मारू: काँग्रेस आमदार

भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले, आमदार सुनील केदार सर्वात मोठे गुंड

नागपूर – जिल्ह्यातील सावनेरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी सिल्लेवाडा येथे ‘भाजप चे झेंडे लावणाऱ्यांना घरात घुसून मारण्याच्या’ धमकी नंतर आता भाजपनं त्यांचं आव्हान स्विकारलं आहे. भाजपनं सिल्लेवाडा गावात घरोघरी जाऊन भाजपचे झेंडे लावत केदांरांना प्रतिआव्हान दिलं आहे. आज सकाळीच सिल्लेवाडा गावात शेकडोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गोळा झाले होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार आणि आमदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात घराघरावर भाजपचे झेंडे लावले.

बस फेरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या श्रेयवादाच्या लढाईवरून काँग्रेस आमदार सुनील केदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांच्यात हमरीतुमरी झाली होती. त्यानंतर आज भाजपने झेंडे लावण्याचे आंदोलन केलं.

जशी-जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. तसं राजकीय वातावरण तापत चाललं आहे. आमदार सुनिल केदार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमधील वाद चांगलाच पेटला.

न्यायालयीन प्रकरणातील आवश्यक माहिती प्राथमिकतेने द्या

वी : ॲड. धर्मपाल मेश्राम

मनपा पॅनलवरील वकिलांच्या आढावा बैठकीत विधी समिती सभापतींचे निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील न्यायालयीन प्रकरणांमध्ये मनपातील संबंधित अधिका-यांच्या असहकार्यामुळे प्रकरणात अडणची निर्माण होतात. विशेषत: उच्च न्यायालयातील प्रकरणांमध्ये अधिका-यांच्या असहकार्याने न्यायालयीन अडथळे येतात. अधिका-यांच्या असहकार्याने येणा-या न्यायालयीन अडथळ्यांची गांभीर्याने दखल घेत अधिका-यांनी आवश्यक माहिती मनपा वकिलांना प्राथमिकतेने पुरविण्याचे निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मनपा पॅलनवरील वकिलांच्या आढावा बैठकीत दिले.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये शुक्रवारी (ता.१३) आयोजित मनपा पॅलनवरील वकिलांच्या आढावा बैठकीत विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्यासह विधी अधिकारी ॲड.व्यंकटेश कपले, ॲड.सुधीर पुराणीक, ॲड.ए.एम.काझी, ॲड.जैमिनी कासट, ॲड. मेहाडीया, ॲड.अमित प्रसाद, ॲड.रोहन छाबरा, ॲड.सचिन अग्रवाल, ॲड.अमित कुकडे, ॲड.डी.एस. देशपांडे, ॲड.सचिन नारळे, ॲड. सुषमा ढोणे, ॲड. अपूर्वा अजंठीवाले, ॲड.कांचन निंबुळकर, ॲड.दंडवते, ॲड.नंदेश देशपांडे, ॲड.एस.जी.हारोडे, सहायक विधी अधिकारी अजय माटे, प्रकाश बरडे, आनंद शेंडे, सुरज पारोचे आदी उपस्थित होते.

अनुपस्थितीत वकिलांना कारणे दाखवा नोटीस

मनपा पॅलनवरील वकिलांच्या आढावा बैठकीला अनुपस्थितीत वकिलांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय व कामगार व औद्योगिक न्यायालयातील प्रकरणांचा आढावा घेतला. प्रकरणांमध्ये येणा-या अडचणी जाणून घेत त्याबाबतीतच्या सुचनांचाही ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी स्वीकार केला.

मनपाच्या न्यायालयीन प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा होण्यासाठी प्रकरणाशी संबंधित अधिका-यांनी संबंधित अधिवक्त्यांशी योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. तसेच प्रकरणासंदर्भात आवश्यक माहितीबाबत सहकार्य करणेही आवश्यक आहे. मात्र बहुतांशी प्रकरणांमध्ये अधिका-यांकडून योग्य सहकार्य न मिळाल्याने प्रकरणांच्या निकालात अडसर निर्माण होतो. पॅनलमधील वकिलांच्या तक्रारीवर दखल घेत अधिका-यांनी प्रत्येक प्रकरणात प्राथमिकतेने माहिती पुरवून आवश्यक ते सहकार्य करण्याचेही निर्देश विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

याशिवाय वकिलांना येणा-या अडचणींसदर्भात आवश्यक त्या सुचना मागवून त्याबाबत मनपा आयुक्तांनी दिशानिर्देश देणारे परिपत्रक प्रशासनातील अधिका-यांना निर्गमीत करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन-लोकेश रसाळ, माधुरी पालीवाल यांच्या अथक प्रयत्नातून कार्यक्रम संपन्न

विदर्भ वतन प्रतिनीधी – गीता कृष्ण महिला अर्बन क्रेडिट आॅप़ सोसायटी नागपूर यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्ष भव्य कार्यकर्ता मेळावा, जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांना १००० स्कूल बॅग वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रमाचे आयोजन लोकेश रसाळ व सह आयोजक प्रा. सौ. माधुरी पालीवाल यांनी केले़ या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री मा़चंद्रशेखर बावनकुळे, कॅबेनेट मंत्री, मा़ महादेव जानकर, राज्यमंत्री दर्जा प्राप्त शेळी व मेंढी विकास महामंडळ अध्यक्ष मा़बाळासाहेब दौडतले खाक़ृपाल तुमाने, आ़सुधाकर देशमुख, मा़आ़मोहन मते भाजपा महामंत्री, मा़राजाभाऊ पातकर तथा भाजप पक्षातील ज्येष्ठ नेते मान्यवर उपस्थित होते़ धनगर समाजाला आरक्षण जर कोणी मिळवून देईल ते फक्त भाजप सरकार देईल असा विश्वास ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिला़ मा़ महादेव जानकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात राज्य सरकार सकारात्मक भुमिका घेणारच तसेच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण भाजपशी युतीत राहू असे उपस्थित पत्रकारांना व कार्यकर्त्यांना सांगितले़ आरक्षणा बाबतच्या प्रश्नांवर त्यांनी भाजप सरकार आरक्षण देईलच असे जाहीर कार्यक्रमात सांगितले़ विदर्भातील पक्षवाढीसाठी सतत जनसंपर्कात व कार्यकर्त्यांच्या संपर्कात असणारे विदर्भातील लोकेश रसाळ, माधुरी पालीवाल, स्वरणीम दीक्षित या कार्यकर्त्यांना पक्षाने उच्च पदावर विराजमान करावे असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जानकरांना सुचविले़ येत्या विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका नक्कीच वेगळी ठरेल असे त्यांनी सांगितले़ विदर्भातील कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनासाठी युवक प्रदेश उपाध्यक्ष नागपूर लोकेश रसाळ, प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी माधुरी पालिवाल यांचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.